बियाणांपासून ते शेती अवजारांपर्यंत MahaDBT वर अनुदान योजना सुरू, अर्ज कसा करायचा? MahaDBT yojana

MahaDBT yojana महाराष्ट्र शासनाचा “आपले सरकार महाडीबीटी” हा उपक्रम राज्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा थेट लाभ मिळवून देणारा अग्रगण्य डिजिटल मंच ठरला आहे. शेतकऱ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी महाडीबीटी पोर्टलवरून कृषी यंत्रसामग्री, सिंचन सुविधा, फलोत्पादन, संरक्षित शेती यांसारख्या योजनांसाठी अर्थसाह्य स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिलं जातं.

राज्य शासनाच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login या संकेतस्थळावर शेतकरी कुठूनही, कधीही अर्ज करू शकतात. नोंदणीनंतर शेतकऱ्यांना पोर्टलवरून त्यांच्या अर्जाची स्थिती तपासता येते. प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जसे की 7/12, 8अ उतारे, आधार संलग्न बँक खात्याचे पासबुक, खरेदीची पावती इत्यादी अपलोड करता येतात.

अर्ज प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना एसएमएस आणि ईमेल अलर्ट मिळतात. सर्व फायदे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात येतात. अर्ज मंजुरी प्रक्रिया पूर्णपणे सुलभ आणि ऑनलाइन आहे. MahaDBT yojana

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

शेतकऱ्यांनी अर्ज भरण्यापूर्वी पोर्टलवरील मार्गदर्शक पुस्तिका वाचावी. अर्जदाराने पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. कोणत्याही टप्प्यावर पात्रता अयोग्य आढळल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातात.

महाडीबीटी अंतर्गत महत्त्वाच्या योजना आणि अनुदान दर

  • प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (ठिबक व तुषार संच) : 45% ते 55% अनुदान
  • कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान / राज्य पुरस्कृत योजना : ट्रॅक्टर, अवजारे – 40% ते 60% अनुदान
  • राष्ट्रीय कृषी विकास योजना : यांत्रिकीकरण, संरक्षित शेती – 40% ते 60%
  • राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (कडधान्य, गळीतधान्य, कापूस) : बियाणे व यंत्रे – 50% अनुदान
  • मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना : ठिबक व तुषार संच – 25% ते 30%
  • एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : शेडनेट, पॉलिहाऊस, पॅक हाऊस – 50%
  • भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : संत्रा, मोसंबी, आंबा – 100% अनुदान

लॉटरी व अंतिम प्रक्रिया

पात्र अर्जांची निवड पारदर्शक लॉटरी प्रणालीद्वारे होते. लॉटरीत निवड झाल्यानंतर 10 दिवसांत आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावीत. त्यानंतर कृषी विभागातर्फे कागदपत्रांची छाननी करून 10 दिवसांत पूर्वसंमती पत्र दिलं जातं.

पूर्वसंमतीनंतर 30 दिवसांत खरेदी करून देयके पोर्टलवर अपलोड करावी लागतात. त्यानंतर तपासणी होते आणि पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा केलं जातं. MahaDBT yojana

Leave a Comment