Farmer Subsidy List प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वानुसार अनुदान वाटण्यासाठी राज्यातील दीड लाख शेतकऱ्यांची पहिली यादी कृषी विभागाने प्रसिद्ध केली आहे. कृषी योजनांमधून अनुदान मिळवण्यासाठी ‘महाडीबीटी’च्या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांची निवड सोडत पद्धतीनुसार केली जात होती. मात्र, सोडत पद्धत रद्द करून राज्य शासनाने ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ अशी नवी पद्धत स्वीकारली आहे.
त्यानुसार, आता पहिल्या टप्प्यात १,५२,१४३ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. या शेतकऱ्यांनी निवड केलेल्या घटकांची अनुदान रक्कम ८४० कोटी रुपयांच्या आसपास आहे. नव्या पद्धतीला बुधवारी (ता. २१) मुंबईत झालेल्या खरीप हंगामाच्या राज्यस्तरीय बैठकीत राज्य शासनाने मान्यता दिली व त्यानंतर लगेचच शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अनुदानासाठी निवड झाल्याबद्दल दीड लाख शेतकऱ्यांची यादी महाडीबीटी संकेतस्थळावर, कृषी विभागाच्या संकेतस्थळावर तसेच कृषी विभागाच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या लॉगइनमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
याशिवाय या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून लघूसंदेश (एसएमएस) पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता पुढील दहा दिवसांत अत्यावश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील. त्याबाबत शेतकरी ओळख क्रमांकाच्या (फार्मर आयडी) आधारे संकेतस्थळावर लॉग इन करताच माहिती उपलब्ध होईल. Farmer Subsidy List
निवड झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप फार्मर आयडी मिळाला नसल्यास गावातील सार्वजनिक सुविधा केंद्रांतून मोफत काढून घ्यावा. मात्र, दहा दिवसांत कागदपत्रे जमा न केल्यास निवड केलेला अर्ज आपोआप रद्द केला होणार आहे, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.