खरीप हंगाम 2024 मध्ये विविध नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या पीक नुकसानीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना एकूण 3,720 कोटी रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. यापैकी 9 मे 2025 पर्यंत 3,126 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. उर्वरित भरपैकी 307 कोटी रुपये लवकरच वितरित होणार असून, 287 कोटी रुपये राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना दुसरा हप्ता दिल्यानंतर वितरीत केले जाणार आहेत.
भरपाई मंजुरीसाठी चार प्रमुख घटक
शेतकऱ्यांना विमा भरपाई चार वेगवेगळ्या ट्रिगरच्या आधारे मंजूर करण्यात आली आहे:
स्थानिक नैसर्गिक आपत्ती (2,720 कोटी)
हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (713 कोटी)
काढणी पश्चात नुकसान (270 कोटी)
पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान (18 कोटी)
या एकूण पीक विमा मंजूर भरपैकी सध्या स्थानिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर्स अंतर्गतच भरपाईचे वितरण सुरू आहे. कारण सध्या राज्य सरकारने फक्त पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिला आहे. या दोन ट्रिगर्सअंतर्गत मंजूर रक्कम 3,433 कोटी रुपये असून, त्यापैकी 3,126 कोटी रुपये जमा झाले असून 307 कोटी रकमेचे वितरण प्रक्रियेत आहे.
काढणी पश्चात नुकसान व पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाईचे वितरण राज्य सरकारने विमा कंपन्यांना दुसरा हप्ता दिल्यानंतरच होणार आहे. त्यामुळे या टप्प्यातील शेतकऱ्यांना भरपाईसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
वितरित भरपाईचा तपशील (9 मे 2025 पर्यंत)
स्थानिक आपत्ती अंतर्गत भरपाई: 2,418 कोटी
हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत भरपाई: 708 कोटी
दरम्यान, या भरपाईमुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला आहे. मात्र, पूर्ण रकमेचे वितरण होण्यासाठी राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना तातडीने दुसरा हप्ता दिला जावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.